जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत डॉ. विशाल दत्तात्रय भारूड यांच्या “ऍग्रीकल्चर सॉईल अनालिसिस अँड इवोल्युशन थ्रू गामा रेऑटोनेशन” या महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पासाठी सेंटिलेशन डिटेक्टर (सोडियम आयोडाइड डोपड विथ थॅलियम) मंजूर झाले आहे. हे अत्याधुनिक रेडिओऍक्टिव्ह डिटेक्टर मु.जे. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात १७ जुलै रोजी यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय भारंबे, के.सी.ई. सोसायटीच्या पी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर महाजन, इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. कविता पाटील, संशोधक प्राध्यापक डॉ. विशाल भारूड, विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नवीन डिटेक्टरचा उपयोग शेतातील मातीत असणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे विश्लेषण करण्यासाठी करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर मातीची जलधारण क्षमता आणि तिच्या भुसभुशीतपणावर किरणोत्सारी पदार्थांचे नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यासही या डिटेक्टरच्या माध्यमातून करता येणार आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील हे पहिलेच डिटेक्टर असल्याने, त्याचा मोठा लाभ संशोधक विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय ढोले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. जयदीप साळी, के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष मा. प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय भारंबे, सोसायटीच्या पी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर महाजन, डॉ. पद्माकर चव्हाण आणि डॉ. प्रेमजीत जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रातील संशोधनाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा आहे.



