राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहीद राकेश शिंदे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड उपस्थित होते. तसेच शहीद राकेश शिंदे यांच्या मातोश्री व परिवार, संस्थेचे प्राचार्य महेंद्र राजपूत, पत्रकार दीपक चांदवानी, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी उपस्थित तरुणांना शिस्त, वेळेचे महत्त्व, नशा व अपप्रवृत्तींपासून दूर राहणे, तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग, समाजासाठी योगदान, तसेच स्वास्थ्य व फिटनेसचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांचा दाखला देत तरुणांना संदेश दिला, “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका,” असे सांगत त्यांनी युवकांना आपल्या स्वप्नांना ध्येयात रूपांतरित करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य महेंद्र राजपूत यांनी केले. त्यांनीही आपल्या भाषणातून युवकांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. त्यांच्या मेहनतीची दखल घेत, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रीय युवा दिवसाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजासाठी योगदान देण्याचा संदेश देण्यात आला.

Protected Content