गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; अजय-अतुल यांच्या कार्यक्रमाच्या तयारीचा घेतला आढावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील पर्यटनस्थळी ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लार्इव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तयारीने वेग घेतला आहे. या तयारीचा आज महसूल व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेवून आवश्यक त्या सूचना दिल्यात.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. रावळ, उपजिल्हाधिकारी गोसावी, शाखा अभियंता अहिरे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेनो श्री. बुआ यांची प्रत्यक्ष स्थळी जावून तयारीचा आढावा घेतला. जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवर असलेल्या बेटावर पर्यटनस्थळाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

22 एकर वरील विस्तीर्ण परिसरात हा सोहळा रंगणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजेपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून रात्री ८ ते १२ दरम्यान प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम होईल. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी वाघूरच्या पाण्यातून बोटीच्या माध्यमातून जावे लागणार आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटरवर असलेल्या सुंदर बेटावर हे पर्यटनस्थळ असून तेथे हा संगीत सोहळा होत आहे.

प्रेक्षकांकडून प्रतिसाद
जळगाव जिल्ह्यात अजय-अतुल यांचा पहिल्यांदाच लार्इव्ह कार्यक्रम होत असून प्रेक्षकांकडून प्रतिसाद देखील मिळत आहे. हा देखणा सोहळा यशस्वी करण्यासाठी व पर्यटन वाढीला चालना मिळावी यासाठी प्रशासनाने देखील पुढाकार घेतला आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. अजय-अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीचा लाईव्ह कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा; अधिक माहितीसाठी (9096961685), (9511770619) किंवा (7559225084) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content