
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका ठिकाणी पत्त्यांच्या क्लबवर अक्षय तृतीयेच्या पूर्व संध्येला पडलेल्या धाडीत एसडीपीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मोठी शाळा भरवल्याचा धक्कादायक आरोप झाला होता. साधारण १० ते १५ लाखाची रोकड अवघ्या पावणे तीन लाख दाखवल्याची खमंग चर्चा रंगली होती. या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने दोन वेगवेगळी वृत्त प्रकाशित केली होती. आता या प्रकरणाची डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी गंभीर दखल घेतली आहे. धरणगाव धाड प्रकरणाची चौकशी सुरु केली असून कुणीही दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,अशी प्रतिक्रिया श्री.अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान, चौकशी सुरु झाल्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या गुन्ह्यातील एका आरोपी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ सांगितले होते की, धाडीच्या दिवशी माझ्या खिशातून ३५ हजार रुपये जप्त केले गेले. मात्र, फिर्यादीत फक्त १२ हजार रुपये जप्त केल्याचे दाखवीण्यात आले होते. अशीच ओरड इतर ४० जणांची होती. विभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांच्या पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी नेहमी प्रमाणे मोठी शाळा भरवत पैसे लंपास केल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे हा क्लब चालविण्यासाठी स्थानिक पातळीवर आधीच सेशन भरण्यात आले होते,अशी पण चर्चा होती. ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने या संदर्भात ‘ धरणगावातील धाड आणि दोन कर्मचाऱ्यांची ‘शाळा’ !’ आणि ‘असे केले धरणगावच्या धाडीतून लाखो रुपये गायब !’ या शीर्षकांखाली वृत्त प्रकाशित केले होते. धाडीतील पैसे कशा पद्धतीने डीवायएसपी अग्रवाल यांना न कळू देता गायब करण्यात आले होते, याबाबत सविस्तर वृत्तांत देखील प्रकाशित करण्यात आला होता.
दरम्यान, हे प्रकरण डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी गंभीरतेने घेतली असून सुटीवरून परत आल्याबरोबर चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे चोपडा विभागीय कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली असून या चौकशीत नेमके कोणते कर्मचारी दोषी आढळतात? किंवा त्यांना क्लीन चीट मिळते, याची चर्चा आता पासूनच धरणगावात रंगायला लागली आहे.