जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केट येथे “सधन ग्रुप ऑफ कंपनी” हि कार्यरत आहे. हि कंपनी “फ्रेंडली लोन एग्रीमेंट” या नावाखाली नागरिकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवीत आहे. मात्र यात भोळेभाबडे नागरिक फसले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या कंपनीची चौकशी व्हावी अशी मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांना मंगळवारी ३० जुलै रेाजी दुपारी २ वाजता दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात गोलाणी मार्केट येथे “सधन ग्रुप ऑफ कंपनी” हि कार्यरत आहे. या कंपनीचं कार्यालय हे गोलाणी मार्केट येथे ‘सधन मासिक आरोग्य विचार’ या कार्यालयात थाटण्यात आले आहे. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, सदर कंपनी हि नियमबाह्य काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जवळपास १०० पेक्षा अधिक लोकांनी यात लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली असून त्यात अनेक एजंट हे दामदुपटं पैसे मिळविण्याचे आमिष भोळ्याभाबड्या व नोकरदार नागरिकांना दाखवून लाखो रुपये गोळा करीत आहे. मागील २० ते २२ महिन्यांपासून या जळगाव शाखेतून सुमारे ३० कोटींच्या जवळपास रोख स्वरूपात “फ्रेंडली लोन एग्रीमेंट” या नावाखाली कंपनीत नागरिकांनी गुंतविले आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी यात आपण व्यक्तिशः लक्ष घालून यातील कंपनीचे अधिकारी, एजंट यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी विनंती करीत आहे. निवेदन देताना महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, गौतम सरदार, किरण अडकमोल, जितेंद्र शिरसाठ उपस्थित होते.