Home Cities जळगाव विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम : ३५ कारपेंटर बांधवांना ड्रिल व कटर...

विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम : ३५ कारपेंटर बांधवांना ड्रिल व कटर मशिन्सचे वाटप

0
262

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कारपेंटर समाजाच्या सक्षमीकरणासाठी विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानने घेतलेली पुढाकाराची भूमिका कौतुकास्पद ठरत आहे. प्रतिष्ठानतर्फे नुकत्याच आयोजित कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून ३५ कारपेंटर बांधवांना अत्यावश्यक अशा ड्रिल आणि कटर मशिन्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण समाजात नवा उत्साह निर्माण झाला असून उपस्थित मान्यवरांनी या कार्याचे मोठ्या मनाने स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक एम. टी. लुले, गोपाल देवरे, हरी लोहार, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, विद्यानंद मानकर, बाळासाहेब पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. पूजनानंतर विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानच्या उद्घाटन सोहळ्याचे विधिवत आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमातील लकी ड्रॉ हा मुख्य आकर्षणाचा भाग ठरला. एका लहानग्याच्या हस्ते पहिली पावती जाहीर होताच सभागृहात जल्लोषाचे वातावरण तयार झाले. पहिल्या क्रमांकावर आलेल्या विजेत्यास कटर मशीन प्रदान करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. ड्रॉमध्ये निवड झालेल्या इतर लाभार्थ्यांनाही ड्रिल व कटर मशिन्स देण्यात आल्या.

या प्रसंगी कारपेंटर बांधवांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी समाजासाठी घेतलेल्या निस्वार्थ पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचे अनेकांनी नमूद केले. यावेळी बोलताना ॲड. जमील देशपांडे यांनी समाजासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि एकोप्याने राहण्याचे आवाहन केले.

राजेंद्र निकम यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठान ही संस्था समाजबांधवांकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता कार्यरत राहील आणि कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करणार नाही. ही संस्था समाजाच्या एकतेसाठी, सक्षमीकरणासाठी आणि स्वाभिमानासाठी समर्पित राहील, असेही ते म्हणाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यामागे विकास पाथरे, कैलास देवरे, समाधान निकम, आनंद देवरे, संदीप जगताप, ज्ञानेश्वर निकम या सर्वांची मेहनत उल्लेखनीय ठरली. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी तर आभार प्रदर्शन किरण खैरनार व गोविंद जाधव यांनी केले.


Protected Content

Play sound