जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी पोलिस चौकीजवळ मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वाहनात गॅस भरताना झालेल्या स्फोटातील गंभीर जखमी गॅस सेंटर चालक दानिश शेख (वय- ४६) यांचा मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
इच्छादेवी पोलीस चौकीजवळ बुधवारी व्हॅनमध्ये अवैधरित्या गॅस भरताना हंडीचा भीषण स्फोट झाला होता. त्यात तीन महिलांसह दहा जण भाजले गेल्याची घटना घडली होती. स्फोटात जखमी झाल्यानंतर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दानिश यांची प्रकृती गंभीर असल्याने तसेच ते स्फोटात ६० टक्केपेक्षा अधिक भाजले गेले असल्याने पुढील उपचारासाठी बुधवारी रात्री मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता उपचार सुरू असताना दानिश यांचा मृत्यू झाला. दानिश हे मूळचे भुसावळ येथील रहिवासी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.