Home Cities जामनेर सामाजिक कार्यकर्त्यांवर अमानुष मारहाण व जातीय शिवीगाळ: राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सामाजिक कार्यकर्त्यांवर अमानुष मारहाण व जातीय शिवीगाळ: राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सासरच्या त्रासाला कंटाळलेल्या एका विवाहित महिलेला मदत करणाऱ्या पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या मुलींना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आणि जातीय शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित संघटनांनी राज्यव्यापी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील पीडित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून पुणे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदत मागितली होती. आपत्कालीन परिस्थितीमुळे, यातील दोन मुलींनी तिला एका रात्रीसाठी आपल्या खोलीवर आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पीडित मुलगी निघून गेली. मात्र, या पीडित मुलीचे सासरे, जे स्वतः निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांनी या तीन सामाजिक कार्यकर्त्या मुलींच्या घरी आणि कामाच्या ठिकाणी पोलीस पाठवून त्यांना धमकावले.

या मुलींना बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, तसेच जातीयवाचक शिवीगाळही करण्यात आली. मूळ पीडित मुलीचा सासरी होणारा छळ, तिला मदत करणाऱ्या मुलींचा शारीरिक-मानसिक छळ आणि जातीय शिवीगाळ हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन एफआयआर (FIR) दाखल करण्याची विनंती केली, परंतु पोलिसांनी अत्यंत बेजबाबदारपणे या मागणीकडे दुर्लक्ष केले. तब्बल तीन दिवस एफआयआर नोंदवून घेण्यात आली नाही, उलट पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. चौथ्या दिवशी, अप्पर पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस निरीक्षकांकडून अशा प्रकारचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे लेखी दिले. पोलीस अधिकाऱ्यांची ही कृती गंभीर असून, पोलीस यंत्रणेच्या संवेदनशीलतेविषयी शंका निर्माण करणारी आहे.

या प्रकरणातील सर्व पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, संघटनांनी राज्य सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत:
१. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा. २. मुलींना अयोग्य वागणूक देणाऱ्या आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. ३. संबंधित सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. ४. सासरच्या छळाने आश्रयासाठी बाहेर आलेल्या मूळ पीडित मुलीला संरक्षण व सुरक्षितेची हमी द्यावी.

निवेदन देतानां प्रल्हाद बो-हाडे, शोभा बोऱ्हाडे, डॉ. प्रशांत पाटील, प्रतिभा नरवाडे (दाभाडे), भीमराव दाभाडे, रमेश गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound