मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. अशातच एका प्रभावशाली आदिवासी नेत्यांच्या पुत्राने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आदिवासी नेते माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज २० ऑक्टोबर रोजी प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईतील पक्ष कार्यालयात संपन्न झाला असून यावेळी अजित पवार व सुनील तटकरे उपस्थित होते. भरत गावित यांचे वडील दिवंगत माणिकराव गावित काँग्रेसचे प्रमुख नेते होते. ते २००४ मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री होते आणि २०१३ साली सामाजिक न्याय राज्यमंत्री देखील होते. त्यांचा उत्तर महाराष्ट्राच्या आदिवासी बहुल भागात प्रभाव आहे.
भरत माणिकराव गावित यांचा नंदुरबार भागात मोठा प्रभाव असून, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षाचा आदिवासी जनाधार वाढणार आहे. सध्या ते आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे नवापूरचे अध्यक्ष आहेत, ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तसेच लाडकी बहिण योजना नवापूर विधानसभा मतदारसंघातील समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.