जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून तलावजवळील स्मशानभूमीजवळ एका बूकबधीर असलेल्या दुचाकीस्वाराने एकाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने भाजले गेल्याची घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राम नगरात दिलीप जोरसिंग राठोड वय ४५ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते मेहरुण तलाव जवळील स्मशानभूमी जवळून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार महेंद्र मधुकर साळुंखे (रा. मेस्को माता नगर) हा मूकबधीर त्यांच्याजवळ आला व त्याने काहीही न बोलता त्यांच्या हातातील बाटलीमधील ज्वलनशील पदार्थ दिलीप राठोड यांच्या चेहऱ्यावर, छाती, मान व हातावर फेकले. त्यात ते गंभीररित्या भाले गेले. ज्वलनशील पदार्थ फेकताना ते महेंद्र साळुंखे याच्याही चेहऱ्यावर उडाले. त्यामुळे त्याच्याही चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.
घटनेनंतर तो तेथून पळून गेला तर जखमी राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांनी महेंद्र साळुंखे याला अटक केली असून बुधवारी ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय पाटील करीत आहेत.