Home धर्म-समाज ट्रोलिंगमुळे व्यथित इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय ; भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर...

ट्रोलिंगमुळे व्यथित इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय ; भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

0
389

अहमदनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील तीव्र ट्रोलिंगमुळे मोठ्या मानसिक तणावात असून, त्यांनी कीर्तन सोडण्याचा संकेत दिला आहे. आपल्या एका कीर्तनादरम्यान त्यांनी भावनिक होत “आता कीर्तन थांबवणार” असे विधान केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. मात्र, साधेपणाचे उपदेश करणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा मोठ्या उत्साहात साजरा करतात, अशी टीका सोशल मीडियावर सुरू झाली. या टीकेमुळे महाराज मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज भावनिक होत म्हणाले की, “लोक आमच्या आयुष्यातील कष्ट पाहत नाहीत. आमची मुलं लहान असताना आठ-आठ दिवस भेट होत नसे. आणि आता लोक माझ्या मुलीच्या कपड्यांवर टीका करतात. एवढं खाली कसं जाऊ शकतात लोक? चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट्स येत आहेत. पण तिचा बाप म्हणून माझ्या भावना कोणाला कळणार?”

ते पुढे म्हणाले, “मी ३१ वर्ष लोकांसाठी कीर्तनं केलं. पण आता मन कंटाळलंय. माझ्यापर्यंत टीका आली असती तर चालली असती, पण आता कुटुंबावर झालीय. त्यामुळे मी विचार करतोय, आता कीर्तनं थांबवावी लागतील. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे, पण ही अवस्था पाहून राहवत नाही. कॅमेरावाले आणि ट्रोल करणाऱ्यांनी माझं आयुष्य बेचैन केलंय.”

दरम्यान, या घटनेनंतर इंदुरीकर महाराजांचे चाहते आणि वारकरी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. सोशल मीडियावर #StandWithIndurikar हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, अनेकांनी महाराजांना पुन्हा आत्मविश्वास देण्याचं आवाहन केलं आहे.

इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा हा संगमनेर येथे पार पडला. कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप या नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या साखरपुड्याचा सोहळा राजेशाही थाटात झाला. रथावरून झालेल्या मिरवणुका, वारकरी वेशातील टाळकरी, पारंपरिक स्वरूपातील कार्यक्रम यामुळे या सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, या समारंभात सत्कार, हार आणि शाल-श्रीफळ न स्विकारता साधेपणाचे पालन करण्यात आले.


Protected Content

Play sound