Home पर्यावरण राज्यात जोरदार पावसाचे संकेत; पुणे, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा!

राज्यात जोरदार पावसाचे संकेत; पुणे, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा!


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर तयार झालेल्या नवीन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा १५ ऑगस्टपर्यंत त्याच ठिकाणी राहून त्यानंतर छत्तीसगडमार्गे पश्चिमेकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाअभावी उन्हाचा तडाखा वाढला होता, काही ठिकाणी तर तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. यामुळे ऐन पावसाळ्यातही उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, आता हा नवीन कमी दाबाचा पट्टा आणि मॅडेन ज्युलियन ऑक्सिलेशन (MJO) स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढणार आहे. एमजेओ (MJO) फेज ३ आणि त्यानंतर फेज ४ मध्ये जाण्याचा अंदाज असल्याने, याचा सर्वाधिक फायदा कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला मिळणार आहे.

ऑगस्टअखेरपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत दोन ते तीन सलग कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते. प्रामुख्याने घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट:
विशेषतः, मराठवाडा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात १३ ते २० ऑगस्टदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुणे शहरात १४ ते २० ऑगस्टदरम्यान सर्वाधिक पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, लातूर, नांदेड, सोलापूर, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि मराठवाड्यातील इतर प्रमुख भागांमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा:
आजपासून पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असल्याने, काही भागांमध्ये आज अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


Protected Content

Play sound