
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहेत. मात्र यावेळी मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. टाइम मासिकाने आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान,‘टाइम’च्या कव्हरस्टोरीमुळे मात्र, देशभरात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदींच्या कारभारावर कडवी टीका करताना टाइम मासिकाने नेहरुंचा समाजवाद आणि भारतातली सध्याची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली आहे. हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केले नाही, अशी टीका लेखातून करण्यात आली आहे. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला आहे. ‘नरेंद्र मोदींनी महान राजकीय व्यक्तीमत्त्वांवर हल्ले चढवले. ते काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतात. त्यांनी कधीही हिंदू-मुस्लिमांचे नातं सुधारावे यासाठी प्रयत्न केले नाहीत. तशी इच्छाशक्ती दाखवली नाही,’ अशा शब्दांमध्ये टाइमने मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. ‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’ या वाक्याने लेखाची सुरुवात झाली आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन पाच वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे.