नवी दिल्ली- भारताचा कोरोना मुक्तीचा दर त्यामुळे ७५ टक्क्यांच्या घरात पोहचला आहे. देशातील १ हजार ५१५ प्रयोग शाळांमध्ये कोरोना तपासण्या केल्या जात आहे.
मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार रविवारी सकाळपर्यंत देशात ६९ हजार २३९ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. तर, ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी दिवसभरात ५७ हजार ९८९ कोरोनामुक्त रुग्णांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत कोरोना मुक्तांचे प्रमाण दुप्पटीहून अधिक असली, तरी दररोज सरासरी ८०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३० लाख ४४ हजार ९४० एवढी झाली असली, तरी यातील २२ लाख ८० हजार ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ७ लाख ७ हजार ६६८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत ५६ हजार ७०६ कोरोनाग्रस्तांची कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर रविवारी ७४.९१ टक्के नोंदवण्यात आला. देशातील मृत्यूदर १.८६ टक्के नोंदवण्यात आला आहे.
सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात १४ हजार ४९२ कोरोनाग्रस्तांची भर पडली. महाराष्ट्रासह आंधप्रदेश (१०,२७६), कर्नाटक (७,३३०), तामिळनाडू (५,९८०), उत्तरप्रदेश (५,२१४), पश्चिम बंगाल (३,२३२) तसेच ओडिशात (२,८१९) कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.
देशात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ९२ हजार २२० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख १ हजार १४७ चाचण्या या शनिवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.