नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानने या कार्यक्रमासाठी जम्मू-काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांनाही निमंत्रण दिलंय. त्यामुळे भारताने या कार्यकमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला सरकारचा एकही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर अनेकवेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या या कृत्यामुळे भारत नाराज आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअऱ स्ट्राइक केले यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची परिस्थिती आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी आणावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. अजहर पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत बहावलपूरमध्ये वास्तव्य करतो. तरीही पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कारवाई होत नाही. अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत जैशसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.