नवी दिल्ली, वृत्तसंस्था | भविष्यात पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग होऊ शकतो, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज व्यक्त केला. ते येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचे नरवणे म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई करत पाकचे मनसुबे उधळून लावण्यात भारताला यश येत असल्याचे नरवणे यांनी यावेळी सांगितले.
पीओकेअबत फक्त एका आदेशाची गरज
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून भविष्यात तोही ताब्यात घेऊ, असे स्पष्ट विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केले होते. याबाबत लष्करप्रमुखांना विचारले असता त्यांनी भारतीय लष्कर यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीर हा अखंड भारताचाच भाग आहे. केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीरवरही कब्जा करू, त्यासाठी लष्कर तयार आहे’ कलम ३७० रद्द झाल्यानंतर लष्कराने काश्मीर भागात शांतता राखण्यासाठी लष्कराने अतिशय चांगले काम केले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही लष्कराला साथ दिल्याचे नरवणे यावेळी म्हणाले.