नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले आहे. रविवारी रात्री गाझियाबाद इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. परंतु, यामुळे एक नवा वाद उभा राहिला असून विरोधकांनी आदित्यनाथांनी सेनेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
‘काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते आणि मोदींची सेना आज दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत. हाच फरक आहे… काँग्रेसचे लोक दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी मसूद अजहरच्या नावासमोर ‘जी’ वापरतात’ असे वादग्रस्त टीप्पणी योगी आदित्यनाथांनी जाहीर सभेत केली होती. आदित्यनाथांच्या वक्तव्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. एवढेच नव्हे तर, आदित्यनाथांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. गाझियाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सभा संदर्भातील व्हिडिओ क्लिप आणि त्याचे भाषांतर मागवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झालेय अथवा नाही?, याची चौकशी होणार आहे.