भारतीय लष्कराने केली पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त

pak outpost

श्रीनगर, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतल्याने बिथरलेल्या पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असून आज (दि.१७) भारतीय लष्कराने राजौरी सेक्टरजवळ सीमेपलीकडे पाकिस्तानची सुरक्षा चौकी उद्ध्वस्त केली आहे.

 

दरम्यान, पाककडून सकाळी ६.३० च्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावेळी पाक सैन्याच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. काश्मीर अस्थिर करण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. काही पाकपुरस्कृत दहशतवादी गटही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे काश्मीरमधील सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री केरन सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी घुसखोरीचा डाव हाणून पाडला. त्यानंतर पाकच्या गोळाबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकच्या चार जवानांना ठार केले होते. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात लान्स नायक संदीप थापा (वय ३५) हे आज शहीद झाले आहेत. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. या भागात सध्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे, गोळीबार अद्यापही थांबलेला नाही.

Protected Content