नवी दिल्ली, वृत्तसंस्था | आज विजयादशमी आणि वायुदल दिनानिमित्ताने भारताला पहिले राफेल जेट विमान मिळणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला पोहोचले आहेत, ते याच राफेलमधून फ्रान्स एअरपोर्टच्या तळावरून उड्डाण करणार आहेत. हे राफेल विमान आज भारताच्या सुपूर्द करण्यात येणार आहे, त्याचा प्रदान सोहळा आज तेथे होत आहे, मात्र भारताला त्याचा प्रत्यक्ष ताबा पुढील वर्षी मिळणार आहे. यंदाच्या दसऱ्यानिमित्त राजनाथ सिंह तेथे केवळ शस्त्रपूजन करणार आहेत.
राफेल दोन इंजिनवाले लढाऊ विमान आहे, त्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प मिसाइल तैनात आहेत, त्याद्वारे राफेलमुळे भारताला हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. ही दोन्ही क्षेपणास्त्रे राफेलचे युएसपी आहेत.
फ्रान्सला पोहोचल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ‘राफेल भारतात येत आहे, ८ ऑक्टोबर रोजी राफेल भारताला सुपूर्द करण्यात येणार आहे. सर्वजण यासाठी खूपच उत्साहात आहेत.’ एमबीडीएचे भारताचे प्रमुख लुइक पीडेवॉश यांच्या म्हणण्यानुसार, मिटिऑरला व्हिज्युअल रेंज मिसाइल म्हणून जगातले सर्वाधिक विनाशक मानले जाते. स्काल्प खूप आतपर्यंत जाऊन मारण्यात सक्षम आहे. फ्रान्स भारताला ३६ राफेल विमानांचा पुरवठा करणार आहे.
राफेल जेटची वैशिष्ट्ये :-
१) राफेल असे लढाऊ विमान आहे, ज्याला कुठल्याही प्रकारच्या मिशनवर पाठवले जाऊ शकते. भारतीय वायुदलाची यावर खूप काळापासून नजर होती.
२) हे एका मिनिटात ६० हजार फुटांची उंची गाठू शकते. याची इंधन क्षमता १७ हजार किलोग्रॅम आहे.
३) राफेल कुठल्याही प्रकारच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामे करण्यास सक्षम आहे. म्हणून याला मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखले जाते.
४) याच्यात असलेले स्काल्प क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम आहे.
५) राफेलची मारा करण्याची क्षमता ३,७०० कि.मी. पर्यंत आहे तर स्काल्पची रेंज ३०० कि.मी. आहे.
६) हे अँटी शिप अटॅक, परमाणू हल्ला, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लाँग रेंज मिसाइल अटॅकमध्ये अव्वल आहे.
७) राफेल २४,५०० किलोपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते आणि ६० तासांपर्यंत अतिरिक्त उड्डाण करू शकते.
८) याचा वेग २,२२३ कि.मी. प्रति तास आहे.