नवी दिल्ली-वृत्तसेवा । राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून या करारामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी आणि वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसू शकतो, असा आरोप केला आहे.
शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांनी सांगितले की, “18% शुल्क विरुद्ध 0% हे मी समजावून सांगतो. खोटे बोलण्यात माहीर असलेले पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ या मुद्द्यावर संभ्रम निर्माण करत आहेत. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी आणि वस्त्रोद्योग निर्यातदारांची फसवणूक होत आहे.”

राहुल गांधी म्हणाले, जर भारताने अमेरिकन कापूस आयात केला, तर देशातील कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. मात्र, आयात न केल्यास वस्त्रोद्योग संकटात सापडेल. त्यामुळे ही परिस्थिती “पुढे विहीर, मागे दरी” अशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, बांगलादेश ला अमेरिकेत गारमेंट्स निर्यातीवर 0% शुल्क सवलत देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी अमेरिकन कापूस आयात करण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे बांगलादेश भारताकडून कापूस आयात कमी किंवा बंद करू शकतो, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या गारमेंट्सवर 18% शुल्क लागू झाल्यानंतर त्यांनी संसदेत या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले की, जर भारतालाही अशी सवलत हवी असेल, तर अमेरिकेकडून कापूस आयात करावा लागेल.
“ही गोष्ट देशापासून का लपवून ठेवली गेली? हा खरोखर पर्याय आहे का, की देशाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आहे?” असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतातील कापूस शेती आणि वस्त्रोद्योग हे कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा कणा आहेत. या क्षेत्रांना धक्का बसल्यास लाखो कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळू शकते.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हटले की, दूरदृष्टी असलेले सरकार असा करार केले असते, ज्यामुळे शेतकरी आणि उद्योग दोघांच्याही हिताचे संरक्षण झाले असते. मात्र, सध्याच्या करारामुळे दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आरोपांवर केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



