नवी दिल्ली प्रतिनिधी । केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लढाऊ विमान राफेल आणण्यासाठी ३ दिवसीय पॅरिस दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. उद्या ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनी भारताला पहिले राफेल लढाऊ विमान मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यंदा दसऱ्याला फ्रान्समध्ये शस्त्र पुजा करणार आहेत. पॅरिसमध्ये ८ ऑक्टोबरला पहिलं राफेल विमान भारताला मिळणार आहे. त्याच दिवशी राजनाथ सिंह राफेलमधून उड्डाणही करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते फ्रान्स एयरफोर्सच्या बेसवरुन उड्डाण करणार आहेत. भारताने लढाऊ जेट निर्माता डसॉल्ट एव्हिएशनसह एक करार केला आहे. त्या करारानुसार, फ्रान्स भारताला ३६ राफेल विमान देणार आहे. त्यापैंकीच एक राफेल विमान आणण्यासाठी संरक्षण मंत्री फ्रान्ससाठी रवाना झाले आहेत.