वॉशिंग्टन (वृत्तसेवा) ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. मात्र, भारत यावेळी काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले असून यामुळे धसका घेतलेल्या पाकिस्तानने थेट युद्धाची धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे. ट्रम्प म्हणाले, सध्या भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. काश्मीरमधील तणाव कमी व्हावा, अशी आमची इच्छा आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चा प्रक्रियेत अनेकांचा सहभाग आहे. चर्चेत समतोल साधणं हे आव्हान आहे,’ असे देखील ट्रम्प म्हणाले.