भारत-इटली द्विपक्षीय चर्चा; केंद्र सरकार इटलीतील यशवंत घाडगे स्मारक विकसित करणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जी-७ परिषदेनिमित्त इटलीच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. मेलोनी यांनी मोदी यांचं सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच जी-७ परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील नियमित उच्चस्तरीय संवादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेतला. तसेच संरक्षण आणि या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली, दोन्ही देशांमधील औद्योगिक सहकार्य वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. यामध्ये म्हटलं आहे की या चर्चेवेळी मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या मोहिमेतील भारतीय लष्कराचं योगदान मान्य केल्याबद्दल इटली सरकारचे आभार मानले. तसेच भारत सरकार इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे (दुसऱ्या महायुद्धातील शहीद योद्धे) यांचं मारक विकसित करणार असल्याचं जाहीर केलं. यात इटली सरकारही सहकार्य करेल. इटलीच्या मॉन्टोन शहरात दोन वर्षांपूर्वी तिथल्या सरकारने दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारलं आहे. यामध्ये यशवंत घाडगे या मराठी सैनिकाचंही स्मारक आहे. यशवंत घाडगे हे मूळचे रायगडचे रहिवासी. भारतावर इंग्रजांचं राज्य असताना घाडगे भारतीय लष्करात दाखल झाले.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन सरकारची पिछेहाट होत असताना त्यांनी भारतीय सैनिकांनाही या युद्धात उतरवलं. भारतीय सैनिक तेव्हा मित्र राष्ट्रांच्या बाजूने आणि जर्मनीविरोधात लढले. इटलीतील टायबर नदीच्या किनाऱ्यावर ब्रिटन सरकारने उतरवलेल्या एका सैन्यतुकडीत यशवंत घाडगे (शिपाई – मराठी लाईट इन्फेंट्री) देखील होते. या युद्धात त्यांना वीरमरण आलं. मात्र या युद्धात त्यांनी एकट्याने जर्मन सैनिकांची संपूर्ण छावणी उद्ध्वस्त केली, तसेच त्यांच्या अनेक सैनिकांना ठार केलं. या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस या किताबाने सन्मानित करण्यात आलं. व्हिक्टोरिया क्रॉस’ हा ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च सन्मान मानला जातो

उभय नेत्यांनी या भेटीवेळी भारत आणि इटलीतील वाढता व्यापार आणि आर्थिक सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय आणि खनिजांच्या क्षेत्रातील संबंध वाढवण्याचं आवाहन केलं. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच औद्योगिक मालमत्ता अधिकारांबाबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या घटनेचं दोन्ही नेत्यांनी स्वागत केलं.

Protected Content