नवी दिल्ली वृत्तसंस्था । करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारापर्यंत पोहचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी करोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. गुरुवारी देशात ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ३०,६०२ करोनाबळी झाले आहेत.
देशातील एकूण रुग्णसंख्या १२ लाख ८७ हजार ९४५ वर पोहोचली आहे. देशभरात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत ८,१७,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४०,१३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. म्हणजेच करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा अधिक आहे.
गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. आता चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून, रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यांशी समन्वय साधून केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे. करोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव होत असलेल्या भागांत केंद्राकडून तज्ज्ञांची पथके पाठविण्यात येत आहेत.