कोलंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेत स्फोट घडविणाऱ्या अतिरेक्यांचे भारतातील अतिरेक्यांशी कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. श्रीलंकेत स्फोट घडवून आणण्यापूर्वी या अतिरेक्यांनी काश्मीर, केरळ आणि बेंगळुरूला भेट दिली होती. तसेच या अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये ट्रेनिंगही घेतले असल्याचा दावा श्रीलंकेचे सेना प्रमुख लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश सेनानायके यांनी हा दावा केला आहे. भारतात दहशतवाद्यांनी जाण्यामागच्या उद्देशाबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही सांगितले. मात्र, ते कशाचेतरी प्रशिक्षण किंवा दुसऱ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील होते. तसेच दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटांवरून हा कट स्थानिक नसून बाहेरील शक्तींची मदत आहे. श्रीलंकेतील स्फोटानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनीही अतिरेक्यांचे भारत कनेक्शन तपासण्यासाठी चौकशी सुरू केलेली असतानाच सेनानायके यांनी केलेल्या विधानाला महत्त्व आले आहे. सेनानायके हे श्रीलंकन लष्करातून जाहीर वक्तव्य करणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, काश्मीर व्यतिरिक्त हे दहशतवादी भारतात बेंगळुरू आणि केरळमध्ये सुद्धा गेले होते, अशी गुप्त माहिती आहे.
21 एप्रिलला झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 253 लोक मारले गेले होते. यामध्ये 10 भारतीयांसह 39 विदेशी नागरिकही होते. भारताकडून हल्ल्य़ाची माहिती मिळूनही सुरक्षा करण्यात अपयश आले. आमच्या सैन्याने वेगळ्याच दिशेने तपास केला. मात्र, यासाठी कोणाला दोषी ठरवता येणार नसल्याचे सेनानायके म्हणाले. एकूणच दहशतवादी हल्ल्याचे स्वरुप पाहता हा हल्ला परकीय शक्तींच्या मदतीनेच झाला असे दिसून येते, असं त्यांनी स्पष्ट केले. श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात एकून २५३ लोक ठार झाले होते, तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले होते.