मुंबई- युक्रेन-रशिया युद्धामुळे पेट्रोलियमच्या किंमती वाढतच आहेत. त्यामध्ये आता कमर्शियल सिलिंडर भाववाढीची भर पडली आहे. आज एलपीजी सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाने नैसर्गिक वायूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आज मंगळवारी १ मार्च २०२२ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापरातील १९ किलोच्या एलपीजीच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ केली. त्याशिवाय ५ किलोचा एलपीजी सिलिंडर २७ रुपयांनी महागला असून तो ५६९ रुपये इतका झाला. आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे तूर्त घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर व्यावसायिकांना मात्र दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे.
गेल्याच महिन्यात १९ किलोच्या वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ९१.५ रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र अलीकडे रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक कमॉडिटी बाजारात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांवरील इंधन आयातीचा खर्च वाढला होता.
वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत आज १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १९६२ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर आजपासून २०१२ रुपये झाला आहे. तर चेन्नईत २१८५.५ रुपये इतका झाला आहे. कोलकात्यात १९ किलो सिलींडरसाठी २०८९ रुपये दर असेल.
दरम्यान, सलग चौथ्या महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. आज १ मार्च २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.