जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला असून, प्रस्थापित राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही मैदानात शड्डू ठोकला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये सोमवारी, ५ जानेवारी रोजी दोन प्रमुख अपक्ष महिला उमेदवारांनी एकत्र येत आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला, ज्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विठ्ठल चरणी नतमस्तक होऊन प्रारंभ :
प्रभाग क्रमांक १६ ‘ब’ मधील अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि १६ ‘क’ मधील अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांनी जळगावचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. देवाचा आशीर्वाद घेऊन आणि प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी सकाळी १० वाजता प्रत्यक्ष जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात केली.

ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोष :
प्रचार दौरा सुरू होताच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीने प्रभागातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले. या दोन्ही उमेदवारांनी परस्पर ‘आघाडी’ करत प्रभागाच्या विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
रॅली दरम्यान हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी प्रभागातील घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिलांनी या दोन्ही उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. प्रभाग १६ मधील नागरी समस्या आणि विकासाचे मुद्दे घेऊन या महिला उमेदवार रिंगणात उतरल्या असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.



