जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये एका वेगळ्याच राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे. प्रभाग १६ ‘ब’ मधील अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि १६ ‘क’ मधील अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांनी परस्परांशी आघाडी करत एकत्रित प्रचाराचा नवा पायंडा पाडला आहे. मंगळवारी या दोन्ही महिला उमेदवारांनी अयोध्या नगर परिसरातील विविध वसाहतींमध्ये झंझावाती दौरा करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले.

मतदारांच्या तक्रारी आणि प्रस्थापितांना घरचा आहेर :
प्रचारादरम्यान उमेदवारांनी तृप्ती कॉर्नर, सिद्धिविनायक शाळा, हनुमान नगर, कौतिक नगर, श्रीनगर, म्हाडा कॉलनी आणि देशमुख डेअरी या भागांत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी अनेक नागरिकांनी जुन्या नगरसेवकांबद्दल आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. “गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी आणि गटारींचे प्रश्न जैसे थे आहेत,” अशा शब्दांत मतदारांनी जुन्या लोकप्रतिनिधींच्या कामाचा पाढा वाचला. या तक्रारी शांतपणे ऐकून घेत, हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी निवडून आल्यास या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याचे आश्वासन दिले.

सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक वारसा :
हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे या केवळ निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या नसून, त्यांचा मोठा सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा आहे. प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होणाऱ्या या दोन्ही उमेदवारांनी, केवळ राजकारण न करता ‘सेवा’ करण्याच्या उद्देशाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले. त्यांच्या या प्रामाणिक भूमिकेमुळे प्रभागातील सुशिक्षित वर्ग आणि तरुणांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
महिला शक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
आयोध्या नगर परिसरातून रॅली जात असताना ठिकठिकाणी महिलांनी घराबाहेर येऊन दोन्ही उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. अनेक ठिकाणी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत या दोन्ही अपक्ष महिला उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या प्रचार दौऱ्यात प्रभागातील प्रतिष्ठीत नागरिक, युवक आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.



