रायपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दमदार सादरीकरण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन अशा उत्साहपूर्ण वातावरणात रायपूर येथील मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. रायपूर गावातील पहिल्या महिला इंजिनियर म्हणून उल्लेखनीय यश मिळवलेल्या ऋतुजा रामसिंग परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. पालक आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या विविध पैलूंवर आधारित नाटिका सादर केल्या. ‘राणी लक्ष्मीबाई’ आणि ‘अमर जवान’ या नाटिकांनी विशेष लक्ष वेधून घेतले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत आत्मविश्वासपूर्ण देशभक्तीपर मनोगत व्यक्त करत स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ऋतुजा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाचे नियोजन ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना दिला. त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळाली.
शाळेच्या प्राचार्या भारती परदेशी यांनीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची माहिती देत विद्यार्थ्यांनी देशाप्रती आपली जबाबदारी ओळखावी आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला गावातील मान्यवर, विविध पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटिका आणि विद्यार्थ्यांची भाषणे यामुळे स्वातंत्र्य दिन सोहळा संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनाली देसले, मयुरी वाघ, शिवानी पाटील आणि चंचल वानखडे या शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी राहुल परदेशी यांच्या माय माऊली साऊंड सिस्टिम, रायपूर यांचे सहकार्य लाभले. गोकुळ सपकाळे यांच्या श्रीराम टेन्ट हाऊस, कुसुंबा यांच्या सहकार्याने तसेच पंकज घुगे, चिंचोली यांच्या बलून डेकोरेशनमुळे कार्यक्रमस्थळ आकर्षक सजविण्यात आले. करण कोळी यांच्या रील स्टेटस शूटिंगचेही सहकार्य लाभले. शाळेचे चेअरमन गजेंद्र परदेशी यांनी आभार मानले.



