Home प्रशासन भुसावळात वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन !

भुसावळात वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील अतिक्रमणधारक कुटुंबांच्या तात्काळ पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीने भुसावळ नगरपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत नगरपालिकेकडून पुनर्वसनाबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

२०१६ आणि २०१७ मध्ये रेल्वे प्रशासनाने भुसावळमधील रेल्वे कॉलनी परिसरात अतिक्रमण मोहीम राबवली होती. या मोहिमेमुळे हजारो कुटुंबे उघड्यावर आली होती. त्यावेळी प्रशासनाने या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ही बेघर कुटुंबे अद्यापही पुनर्वसनापासून वंचित आहेत. याबाबत अनेकवेळा नगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही या बेघर नागरिकांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन छेडले आहे. हजारो कुटुंबांना आजही मूलभूत निवाऱ्याशिवाय जीवन जगावे लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

नगरपालिकेकडून या कुटुंबांना लवकरात लवकर पक्के घरकुल उपलब्ध करून द्यावे, तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हे आंदोलन प्रशासनावर दबाव आणण्यासाठी असून, बेघर कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत ते सुरूच ठेवण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound