Home क्राईम मुक्ताईनगर शहरालगत साहित्य चोरीत वाढ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर शहरालगत साहित्य चोरीत वाढ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरालगत सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमधून ठेकेदारांच्या साहित्य चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ठेकेदारांकडून करण्यात येत असून यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी हरताळा फाट्यावरील चोरीची घटना उघडकीस आल्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येते. उलट चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः संत मुक्ताई मंदिर परिसर तसेच हायवेलगत सुरू असलेल्या विविध बांधकाम स्थळांवरून लोखंडी सळया, अँगल, सिमेंट आणि इतर साहित्याची हजारो ते लाखो रुपयांची चोरी होत असल्याचे सांगितले जात आहे.

ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार, चोरीच्या तक्रारी दाखल करताना पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असून काही प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आम्ही नेमके किती दिवस हा त्रास सहन करायचा?” असा संतप्त सवाल संबंधित ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने तातडीने गुन्हे नोंदवून आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ठेकेदारांनी दिला आहे.


Protected Content

Play sound