मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सरकारच्या विविध विभागांची वसतिगृहे, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अनुदानात भरीव वाढ करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या या विद्यार्थ्यांना दरमहा १५०० रुपये परिपोषण अनुदान दिले जाते. त्यात वाढ करून ते २२०० रुपये करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, महिला व बाल विकास या विभागांमार्फत सुरू असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान वाढवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वाढत्या महागाईमुळे हे अनुदानदेखील वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यांचे अनुदान २२०० रुपये करताना, एड्सग्रस्त व मतिमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान १६५० रुपयांवरून २४५० रुपये इतके वाढविण्यात आले आहे. या सर्व संस्थांमधून एकूण ४ लाख ९४ हजार ७०७ विद्यार्थी असून सुमारे ५ हजार संस्था आहेत. यासाठी येणा-या ३४६ कोटी २७ लाख रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.