जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी संसर्ग जास्त असलेल्या परिसरात आणखी अँटीजन टेस्ट केंद्र सुरू करावे तसेच १८ वर्षापुढील व्यक्तींना लसीकरण सुरू केले जाणार असून त्यादृष्टीने नियोजन करीत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मनपात बैठक आयोजित केली होती. बैठकीला मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महापौर जयश्री महाजन यांनी शहरात सुरू असलेले अँटीजन टेस्ट केंद्रांची माहिती घेतली. ज्या केंद्राला प्रतिसाद नसेल ते केंद्र इतरत्र गर्दीच्या ठिकाणी हलविण्यात यावे. रेल्वेस्थानक आणि बस स्थानकावर बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करावी. जळगाव मनपा कार्यक्षेत्रात उपचार आणि इतर कामकाजासाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वाढवावे, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.