भुसावळ (प्रतिनिधी) आज भुसावळ रेल्वे स्टेशनवर नवनिर्मित प्लटफार्म क्रमांक १ आणि २ चे उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी गाडी क्रमांक १२५९७ गोरखपुर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्या नंतर गाडी मुंबईला रवाना झाली.
उद्घटनप्रसंगी खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, भुसावळ रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलला आहे. या नविन प्लटफार्ममुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली आहे. पॅसेंजर गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबविण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची देखील बचत होईल. यावेळी पत्रकारांनी खासदार रक्षा खडसे यांना रेल्वे बाबतीत आणखी आपले काही नियोजन आहे का असे विचारले असता त्या म्हणाल्या की, भुसावळ शहरासाठी पाणी प्रश्न मोठा बिकट झाला आहे तो सोडवण्यास मी प्रथम प्राधान्य देणार आहे .शहरासाठी मेगा रिचार्ज लवकरच सुरू करणार आहे. भुसावळ शहरात रेल्वेची कोच फॅक्टरी सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोच फॅक्टरी सुरू झाल्यावर स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोच फॅक्टरी सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . याप्रसंगी डीआरएम विवेक कुमार गुप्ता , एडीआरएम मनोज कुमार सिंन्हा, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.