भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कठोरे खुर्द येथे ग्रामदैवत जोगेश्वरी माता ग्राम सचिवालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा तसेच कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती.
शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित या कार्यक्रमात ग्राम सचिवालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी आयपीएस कांतीलाल सुभाष पाटील यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत काटोरे खुर्द यांच्या वतीने करण्यात आले होते.

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे तसेच श्री क्षेत्र कुंडलेश्वर वेळी संस्थानचे ह. भ. प. गुरुवर्य भरत महाराज यांनी शुभहस्ते उद्घाटन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व पाण्याचे टँकर लोकार्पण केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रजनी सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत प्रभाकर पाटील, गोलू पाटील, शेतकरी संघाचे सभापती जानदेव शेठ झोपे, दूध संघ संचालिका शाल्मलताई झांबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल वारके, सरपंच दिपाली सागर मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सरपंच सौ. रोहिणी प्रशांत पाटील, उपसरपंच सौ. मनीषा उमाकांत पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी यांनी केले. या कार्यक्रमामुळे गावाच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून ग्रामविकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.



