जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालून मुलांचे बालपण, शिक्षण आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात व्यापक जनजागृतीची सुरुवात करण्यात आली आहे. बालविवाहमुक्त जळगाव जिल्हा घडवण्याच्या उद्देशाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत चित्ररथ व स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ आज २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आला.
या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बालविवाहमुक्त जळगाव जिल्हा हा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून जिल्हाभर जनजागृतीसाठी रवाना करण्यात आले. हा चित्ररथ जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात फिरून नागरिक, कुटुंबे, पालक, युवक-युवती तसेच धर्मगुरू यांच्यापर्यंत बालविवाहाविरोधातील संदेश पोहोचवणार आहे.

जस्ट राईट फॉर चिल्ड्रन अलायन्सच्या भागीदार संस्था आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर तसेच जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी भदाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यामुळे मुलांचे शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान होते, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यावर या मोहिमेत भर देण्यात येत आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्य याबाबत पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आधार संस्थेमार्फत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या बालविकासाशी संबंधित योजनांची माहिती देऊन वंचित व गरजू कुटुंबांना शासकीय योजनांशी जोडण्याचे कार्यही या अभियानांतर्गत केले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, प्रा. विजयकुमार वाघमारे तसेच प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, समन्वयक दीपक संदानशिव, मोहिनी धनगर, सुनील हिवाळे आणि दीपाली हिवाळे हे सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून गावपातळीवर बालविवाह प्रतिबंध, समुपदेशन आणि तक्रार निवारणाचे काम सुरू आहे.



