जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेत एक मोठी क्रांती होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘१२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीन’चे लोकार्पण सोमवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यामुळे आता गरीब व गरजू रुग्णांना महागड्या चाचण्यांसाठी खासगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

या सुविधेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही यावेळी उपस्थित राहतील. १२८ स्लाईस तंत्रज्ञानामुळे हृदयविकार, गंभीर अपघात आणि मेंदूच्या आजारांचे निदान काही सेकंदात आणि अधिक स्पष्टपणे करणे शक्य होईल. खासगी रुग्णालयांत हजारो रुपये खर्च होणाऱ्या या चाचण्या शासकीय रुग्णालयात अत्यंत कमी दरात उपलब्ध होतील.
आपत्कालीन स्थितीत असलेल्या रुग्णांना तात्काळ रिपोर्ट मिळणार असल्याने वेळेवर उपचार करणे सोपे होईल. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी या सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला असून, जळगावच्या आरोग्य क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. या मशिनमुळे जळगावच्या शासकीय रुग्णालयाचा दर्जा अधिक उंचावला असून जिल्हयातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.




