सायन येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे केंद्रीय मंत्री जयंत चौधरींच्या हस्ते उद्घाटन

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज मुंबईतील सायन येथील नूतनीकरण केलेल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. या 60 वर्ष जुन्या प्रतिष्ठित संस्थेला आता नवीन इमारत मिळाली, हा खूप आनंदाचा क्षण आहे, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून कौशल्याविषयी उत्साहाने बोलले होते, परिणामी या क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली आहे. आपल्याला कौशल्याला आकांक्षी बनवायचे आहे. 12 वी नंतर मूल पदवीऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा अल्पकालीन आयटीआय अभ्यासक्रम करू शकेल, असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. जर कोणी मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम शिकत असेल, तर तिला किंवा त्याला माहित असले पाहिजे की नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतर्वासिता किंवा उमेदवारीच्या 50% क्रेडिट्ससह 50% शैक्षणिक क्रेडिट्सची सुविधा देण्यात आली आहे. यासंदर्भात नवीन जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना जयंत चौधरी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 1000 हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत ज्या देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या जवळपास 66% आहेत. ही आपल्या सर्वांसाठी मोठी जबाबदारी आहे आणि आपण या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुधारणा केली पाहिजे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात उद्योग खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, असे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्र्यांनी कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीमध्ये उद्योगाच्या भूमिकेवर बोलताना सांगितले. आमचे उद्योग भागीदार आज प्रशिक्षणार्थींना सामावून घेत आहेत आणि उद्योगांच्या सामाजिक दायित्वाद्वारे या क्षेत्रात पैसे गुंतवत आहेत. आपल्या उद्योगांना जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल, तर कामगारांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, असंही ते म्हणाले. आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेल्या कॉर्पोरेट भागीदारांचे त्यांनी अभिनंदन केले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची आपली महत्त्वाकांक्षा आपण एकत्रितपणे वाटचाल केल्यास पूर्ण होऊ शकेल, असा विश्वासही यावेळी चौधरी यांनी व्यक्त केला.

Protected Content