नूतन मराठा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख व मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून डॉ. इंदिरा पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली. अंकुश पावरा आणि रमेश पावरा यांनी पावरा बोलीतील भोंगऱ्या गीत सादर केले, तर गोविंदा पवारने बंजारा बोलीतील होळी गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थिनी नेहा माळी, नर्गीस, आणि चैताली यांनी स्वागत गीत व अहिराणी बोलीतील लग्नगीत सादर करून कार्यक्रमाला चार चाँद लावले.

डॉ. इंदिरा पाटील यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भाषेमुळे आपला विकास होतो आणि आपले अस्तित्व टिकते असे सांगितले. “मराठी भाषा संवर्धनासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येऊन मराठी साहित्याचे वाचन व वापर अधिकाधिक वाढवले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. “या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते आणि मराठी भाषेचे जतन व संवर्धन साध्य होते,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. समाधान पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. राकेश गोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content