जळगाव प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकात शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते बुधवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
काव्यरत्नावली चौकात रक्तदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या नावामुळे शिवसेना पक्ष आज उभा आहे. त्यांचे आचार आणि विचार प्रत्येक शिवसैनिकांनी केले पाहिजे असे सांगितले. तर जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यावर अंगावर शहारे येतात. शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण करते. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज काव्यरत्नावली चौकात शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले आहे. असे सांगितले.
याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना शहराध्यक्ष शरद तायडे, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक नितीन बरडे, युवासेनेचे विराज कावडीया, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी, शिवराज पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते महारक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी रक्तदान करून बाळासाहेब ठाकरेंना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते रक्तदान केल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या डॉक्टरर्स आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने रक्त संकलनाचे काम सुरू होते.