Home Cities जळगाव गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

0
114

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM Usha) अंतर्गत आयोजित दोन दिवसीय शिक्षक क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन आज, 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, बदलत्या शिक्षण पद्धतींशी शिक्षकांना सज्ज करणे आणि आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याच्या उद्देशाने हा दोन दिवसीय शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. सुरेखा पालवे, विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन मॅनेजमेंटचे चेअरमन डॉ. पराग नारखेडे, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संचालक डॉ. प्रशांत वारके, तसेच प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. उद्घाटन करताना डॉ. सुरेखा पालवे यांनी शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण दर्जावाढीचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या काळाला अनुरूप कौशल्ये आत्मसात करून शिक्षकांनी स्वतःला अधिक सक्षम बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग आणि रघुराम राजन यांसारख्या प्रख्यात व्यक्तिमत्त्वांचे उदाहरण देत शिक्षकांना भविष्यातील नेतृत्वासाठी सज्ज राहण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

त्यानंतर बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ. पराग नारखेडे यांनी एन.ई.पी. पॅटर्न, क्रेडिट सिस्टम, NAAC निकष, अध्यापन पद्धती याबद्दल सखोल विश्लेषण करून शिक्षकांना अद्ययावत शिक्षण व्यवस्थेची दिशा दाखवली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या बदलत्या गरजा, नोट्सची उपलब्धता, शिकवण्याच्या शैलीतील आवश्यक सुधारणा, शैक्षणिक नेतृत्व आणि बौद्धिक भांडवल टिकवण्याचे महत्त्व यावरही त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमधील 30 प्राध्यापक सहभागी झाले आहेत. दोन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सहभागी प्राध्यापकांना विद्यापीठातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आफ्रीन खान यांनी सुरेखरीत्या केले.


Protected Content

Play sound