पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईतील विरारमध्ये एका हिट ॲण्ड रन प्रकरणात मद्यधुंद चालकाने भरधाव कार चालवून पायी जाणाऱ्या प्राध्यापिकेला उडविल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली आहे. आत्मजा राजेश कासट (वय ४६) असे मयत झालेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्मजा कासट या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.
यामध्ये चालक हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. शुभम पाटील वय २५ असे कार चालकाचे नाव आहे. त्याने ही कार दारूच्या नशेत चालविल्याची माहिती समोर आली आहे. तो विरारच्या एका मोठ्या व्यावसायिकचा मुलगा असल्याचे समजते. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.