वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील केनटुकी प्रांतात समाजकंटकांनी एका मंदिरात घुसून तोडफोड करून देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अज्ञात विकृताने मंदिरातील देवाच्या मूर्तींवर काळा स्प्रे पेन्ट लावला. तसेच मुख्य दालनात असलेल्या खुर्च्या सुद्धा चाकूने फाडण्यात आल्या आहेत. ही घटना अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार, रविवारी रात्री उशीरा प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरात घडली. हे मंदिर केनटुकीतील लुइसविले शहरात आहे.
लुइसविलेचे मेयर ग्रेग फिशर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच या शहरात राहणाऱ्या हिंदू बांधवांच्या आपण पाठीशी असून समाजकंटकांना पकडनू योग्य शिक्षा दिला जाईल असे आश्वस्त केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी या मंदिराचा दौरा करून हिंदू समुदायाच्या नेत्यांची भेट सुद्धा घेतली आहे. स्वामीनारायण मंदिराचे पदाधिकारी राज पटेल यांनीही या घटनेचा निषेध केला. सोबतच, आरोपी कुठल्याही धर्माचे असो त्यांना असे करणे मुळीच शोभत नाही. त्यांनी मंदिरात जे काही लिहिले, त्यातून त्यांच्या मनात दुसऱ्या धर्मांबद्दल किती द्वेष आहे हे स्पष्ट होत असल्याचे सुद्धा ते पुढे म्हणाले. अमेरिकेत हिंदू मंदिरावर झालेला हा पहिला हल्ला नाही. यापूर्वी टेक्सास प्रांतात एका मंदिराची तोडफोड करून स्प्रे पेन्ट करण्यात आला होता. त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा केन्ट आणि सिएटल येथे मंदिरांचे विद्रूपीकरण करण्यात आले होते.