कृष्णजन्म सोहळा उत्साहात, भजनांच्या तालात महिला भगिनींनी धरला ठेका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान श्रीकृष्ण एक निःस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञानी, महान होते. त्यांचा जन्म द्वापार युगात झाला. त्यांना त्या काळातील सर्वोत्तम पुरुष, युगपुरुष किंवा युगावतार म्हणून स्थान देण्यात आले आहे, असे प्रतिपादन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले.

अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या पाचव्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कृष्णजन्माची कथा आणि कृष्णचरित्र कथा सुश्राव्य केली. प्रसंगी भाविकांनी श्रीकृष्ण जन्माचा सोहळा उत्साहात साजरा केला. ‘किती सांगू मी, सांगू कोणाला ? आज आनंदीआनंद झाला…’ मथुरेत खेळतोय हरी…’ अशी विविध भजन सादर करून महिला भाविकांनी कृष्ण जन्म उत्सव साजरा केला.

यावेळी उपस्थित भाविक महिलांनी गीतांच्या तालात ठेका धरला. तसेच फुगड्या खेळून महिलांनी आपला आनंद द्विगुणित केला. यावेळी एकमेकांना कृष्ण जन्माच्या शुभेच्छा देत श्रीकृष्णाचा जयघोष करण्यात आला. यावेळी श्री कृष्ण जन्म सोहळ्याचा प्रत्यक्ष देखावा सादर करण्यात आला होता. संध्याकाळी सुवर्ण उद्योजक मनीष जैन, मन्यारखेडा सरपंच नामदेव पाटील, अनिल सावदेकर, राजेश भंडारी, सोहनलाल शर्मा, अमित बेरा, भिकन महाजन, सोनुसिंग पाटील, शांताराम पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शनिवारी श्रीकृष्ण विवाहसोहळा साजरा होणार आहे.

Protected Content