वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी बंद घर फोडून सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड असा एकुण ८० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे हेमंत सुभाष चौधरी (वय-३५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून १० हजारांची रोकड लांबविल्याचे समोर आली. तसेच त्याच गावात राहणारे दिपक गंगाधर पाटील (वय-३९) याचे देखील बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ७० हजारांचा ऐवज लांबविला. दोन्ही घरातून एकूण ८० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरी घडल्यानंतर तक्रारदार हेमंत चौधरी आणि दिपक पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.