मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एबीपी व सी व्होटर्स या संस्थांनी संयुक्तरित्या केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रामध्ये भाजप व एकूणच एनडीएला मोठा धक्का बसणार असून महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
येत्या चार महिन्यात देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून सर्वच पक्ष याच्या तयारीसाठी लागले आहेत. तर विविध संस्था यासाठी सर्वेक्षण देखील करत आहेत. या अनुषंगाने एबीपी आणि सी व्होटर या संस्थांनी संयुक्तरित्या व्यापक सर्वेक्षण करून याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून देशातील महत्वाचे राज्य म्हणून आपले राज्य ओळखले जाते. एबीपी-सी व्होटर्सने केलेल्या जनमत चाचणीत आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर पोलनुसार भाजप व सहकारी पक्षांना १९-२१ जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा मिळाल्या असत्या. इतरांना ०-२ जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला ३७ टक्के, कॉंग्रेसला ४१ टक्के आणि इतरांना २२ टक्के मते मिळतील असे या चाचणीतील निष्कर्षातून नमूद करण्यात आले आहे.
पुढील महिन्यात श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या नंतर लोकसभा निवडणुकांचा बिगुल फुंकला जाईल अशी शक्यता वाटत आहे. यातच आता एबीपी-सी व्होटर्सच्या निष्कर्षांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला अधिक परिश्रम करावे लागतील असे दिसून येत आहे.