Home राजकीय मनपा निवडणुकांमध्ये भाजपच्या ‘बिनविरोध पॅटर्न’वर राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हिडिओ’द्वारे पोलखोल

मनपा निवडणुकांमध्ये भाजपच्या ‘बिनविरोध पॅटर्न’वर राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हिडिओ’द्वारे पोलखोल


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांत यंदा एक अभूतपूर्व चित्र समोर आले असून तब्बल 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने बिनविरोध निवडी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून तीव्र टीका होत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपच्या कथित ‘बिनविरोध पॅटर्न’चा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या बिनविरोध निवडींवर कडाडून टीका करताना, “माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका अनुभवल्या; पण इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची परिस्थिती पहिल्यांदाच पाहतो,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. या पार्श्वभूमीवर आगामी प्रचारसभांमधून राज ठाकरे पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून पोलखोल करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आक्रमक होत असून, कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर मांडण्याची तयारी सुरू आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील काही नेत्यांनी हे पुरावे मनसेकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बिनविरोध निवड प्रक्रियेमागील कथित दबावतंत्र आणि राजकीय हस्तक्षेप उघड करण्याचा मनसेचा दावा आहे.

या प्रकरणात केवळ सभांपुरतेच नव्हे तर कायदेशीर मार्गही अवलंबला जाणार आहे. येत्या सोमवारी मनसे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांबाबत आणि त्यांच्या जागांबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे कळते. याच दिवशी मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदवणार आहेत.

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे 12 दिवस शिल्लक असताना, निकाल जाहीर होण्यासाठी 13 दिवस बाकी आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वीच 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या बिनविरोध नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 44 नगरसेवक भाजपचे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हा मुद्दा निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound