पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | एकीकडे सर्वत्र लग्न समारंभात लाखो रुपये खर्चून विवाह सोहळा साजरा केला जातो; मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लग्नात होणारा खर्च झेपावणार नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या संमतीने साध्या पद्धतीने विवाह करत आदर्श निर्माण केला आहे.
वर व वधू पक्षाची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लग्नात होणारा खर्च झेपावणार नसल्यामुळे राष्ट्रीय चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांनी पुढाकार घेवुन वधू पिता व वर पिता यांच्यासोबत बैठक घेऊन साध्या पद्धतीने विवाह करण्याबाबत प्रस्ताव ठेवला.
यात दोन्ही पक्षांची संमती झाल्याने आज बुधवार, दि. ८ जुन रोजी सारोळा बु” ता. पाचोरा येथील जगदिश पवार यांची सुकन्या पुजा व श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील सोमनाथ लाला वाघ यांचे सुपुत्र रविंद्र यांचा केवळ फुलहार घालत साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला.
विवाहानंतर गुण्यागोविंदाने दोन्ही परिवार हसतमुखाने आप आपल्या घरी परतले. राष्ट्रीय चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या विवाहात सामाजिक कार्यकर्ते खंडू सोनवणे, विनोद अहिरे यांचे योगदान लाभले.