जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा आणि पवित्र महिना रमजान लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन सादर केले आहे.
मुस्लिम बांधवांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. येत्या २ मार्चपासून रमजान महिना सुरू होत असून, या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे ठेवतात आणि दिवसभर प्रार्थना करतात. त्यामुळे या काळात शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक सुविधा व्यवस्थित असणे आवश्यक आहे. रमजान महिन्यात शहरातील मशिदींजवळच्या गटरांची सफाई, कचरा उचलण्याची व्यवस्था नियमित करावी. तसेच, बंद असलेले पथदिवे दुरुस्त करावेत आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. याशिवाय, शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रमजान महिन्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, असे आवाहन मुस्लिम बांधवांनी केले आहे.
याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, शेख अमान, काशिफ टेलर, इलियास नुरी, शेख नझीरुद्दिन, सलमान मेहबूब, अफझल मणियार, फिरोज इकबाल, सय्यद उमर, अता ए मोईन अली, झिशान हुसैन आदी उपस्थित होते. आयुक्तांनी मुस्लिम बांधवांच्या समस्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, रमजान महिन्यापूर्वी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.