जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणातून पुन्हा वाद उद्भवून जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात दोन गट एकमेकांशी भिडले. यात एका तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार झाल्यामुळे तो जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. अन्य पाच जणांवरही उपचार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे दुर्गा उत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटात वाद झाले होते. यानंतर बुधवारी १६ ऑक्टोबर रात्री याच वादातून पुन्हा दोन्ही गटामध्ये वाद झाले. अशोक नगरात अंगणात बसलेल्या राजाराम शिवराम पाटील (वय ५०) यांना एका गटाकडून मारहाण करीत एकाने त्यांच्या पाठीत व हातावर हातोडा मारला. त्यावेळी भूषण बाळू पाटील (वय १८), अजय जयराम पाटील (वय २६) हे तेथे आले. त्यावेळी टोळक्याने अजय पाटील यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर चेहऱ्यावर देखील धारदार शस्त्राने वार केले. भूषण पाटील यांच्या उजव्या डोळ्याजवळ लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या गटातील सुभाष महादु भील (वय ५०), सचिन आत्माराम भील (वय २३), गीताबाई महादू भील (वय ८६) हे जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. अजय पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.